काय वाट'ट्रेल ते - वाघजाई


सततधार पडणाऱ्या पावसाने थोडीफार उघडीप दिली होती. अधून मधुन बरसूनही जात होता. पण तेवढाच. नवख्या मोहिमांसाठी तसा हा काळ योग्य नव्हताच पण तरीही, नियमित वेळापत्रकाला फाटा देऊन प्रसाद अन् मी दोघेच निघालेलो वाट फूटेल तिकडे. म्हटलं,बघुया कूठे घेऊन जातो सह्याद्री माझा! लोणावळा स्टेशन वर उतरल्या उतरल्या पिकनिकछाप सिजनल सो कॉल्ड "ट्रॅकर" ची गर्दी अन् भुशी डॅमची जत्रा,यांच्यामधुन वाट काढत आम्ही एकदाचं अॅम्बिवॅलीच्या बसस्टॉपवर हुश्श झालो. सहारा सिटी चा येथून सुरू होणाऱ्या गुळगुळीत रस्त्यामुळे हाईफाई गाड्यांची अन् स्टॉपवर वाट पाहणाऱ्या वल्ली यांच्यामधली तफावत मनाला लागून गेली.  तितक्यात कुठूनतरी मुलांचा घोळका येऊन बसची वाट पाहत उभा राहिला अन् त्यातल्या एकाने तिथल्या ऑटोवाल्याला भुशीडॅमचं भाडं विचारलं अन् भाडं ऐकून तसाच तो मागे फिरला,त्यावर दुसऱ्याची प्रतिक्रिया, "भिजायले आला ना बे तु ? का गाडीत फिरायले ?" हे ऐकून वऱ्हाडाचा गडी दिसतोय, हे  समजायला काही भाषातज्ञांची गरज लागत नाही, मीही वऱ्हाडातला असल्याने,मला पण ऐकायला भारी मजाच वाटत होती. बाकी वेळ मस्त जात होता.बाजूलाच एक म्हातारे बाबा तंबाकू चोळत बसलेले. बाबा,काय हो गाडी आहे का जायला ?  हाय की येस्टी! वडुस्त्याची ! किती वाजता ? येईल बघा इतक्यात. कसली येतीये ? बाबांना काय कामं आहेत. बाकी गावातली म्हातारी माणसं,यांना कसली आली वेळ,बसतात येऊन आपली चोळत,तंबाकू!  बाकी लोकांना भुशी डॅमचा रस्ता सांगून सांगून आम्ही पण वैतागलो. आणि लोकं !तिथे पाटी असली तरीही विचारणारच !




All the content Copyright -Sandip Wadaskar

शेवटी एकदाचं आडवाटेवरच्या 'येस्टि'ने आडवेळेवरचं दर्शन दिलं अन् आमचा जीव भांड्यात पडला.होती नव्हती सगळी गर्दी कोंबून एसटी निघाली भांबर्डायच्या दिशेने! पण बस माझगांव पर्यंतच जात असल्याचा बॉम्ब टाकुन कंडक्टर निश्चिंत झाला. बोलण्या- बोलण्यात प्रसादची ओळख निघाली कंडक्टरशी. "बघु,माझगावच्या पुढेही बस नेता आली तर",असं आश्वासन देऊन कंडक्टर काका तिकिट फाडण्यत व्यस्त झाले. दोन तीन ट्रेकर चे ग्रूप,भुशि डॅमला भिजायला निघालेला हौशी मुलींचा ग्रुप आणि बाकी गाववाले. कोणी बोचकं सांभाळुन बसलय,कुणाच्या तोंडात गुटख्याचा तोबरा. त्यात माझ्या बाजूला उभ्या असलेल्या सुबकठेंगणीचे केस उगीचच माझा गाल कुरवाळत होते. म्हटलं "बाई,जरा दूर होशील का ?, नाही उगाचच गुद्गुल्या होतायेत." मनातल्या मनात ! आम्ही असल्या गोष्टी मनातच बोलतो. भुशी डॅमजवळ तूफान गर्दी झाली होती,त्या कोलाहलातून येस्टी आपली कशीतरी वाट काढत पुढे सरकत होती. या गर्दीत बसमधली गर्दी जेव्हा उतरून मिसळली,तेव्हा कूठे हायसं वाटलं.

"  गर्जतो मेघातुन,बरसतो नभातुनी बाणांपरी.  
 उरावा अलगद अळवावरती, दिसतोस कसा ? मोत्यापरी !!!! "



मोरी वाहून गेली, कंडक्टर चढणाऱ्या प्रत्येकाला हेच कारण पुढे करून बस माझगावपर्यंतच जाणार आहे, असं सांगत सूटला होता. पण गाववाली, "जाते हो बस,या सरकारी लोकांनाच जायचं नसतं " अन् त्यात,पंगतीत दोन - तीनच दात राहिलेले म्हातारबा रात्रीची जास्त झाल्यासारखे (किंबहुना ती झालीच होती :) ) बसल्या बसल्या कंडक्टरला शिव्या हासडत होते. एव्हाना आम्ही माझगावापर्यंत पोहोचलो आणि खरच मोरीची दुर्दशा झाली होती,आता येथून पाच - सहा किमी च्या पायपीटीला पर्याय नव्हता. आमचा निरोप घेऊन "येस्टी" आल्यावाटेने परतली अन् आम्ही आमच्या पायगाडीला पुढची वाट मोकळी केली. बाकी वातावरणचा मूडच वेगळा होता. चारही बाजूने हिरवाई दाटलेली. आभाळातून धुकं थेट जमिनीला टेकलेलं, भातखाचरे तुडुंब भरून वाहणारे, अधून मधून पावसाची सरही कोसळुन जायची. गाडीतले गाववाले सहप्रवासी झपाझप पावले टाकत केव्हाच नाहीसे झालेले आम्ही मात्र आजूबाजूच्या हिरवळीचं नेत्रसूख घेत निवांत चाललोय. सालथर खिंडीच्या अलीकडे घनदाट झाडीने सह्याद्रीच्या वैभवाची पुन्हा एकदा जाणीव झाली. हलक्यास्या पावसाच्या सरीमुळे होणारा पानांचा सळसळ आवाज सुखावुन जात होता,मधेच सुरू होणाऱ्या पर्जन्यपक्ष्यांच्या गोड गाण्याने कर्णराज खुश व्हायचे. हे सर्व चालु असताना, मागून गाडीचा ऐकू आला तोच गाडीत उमेश सर ! मागच्या वेळी मदनगड हौद साफसफाई मोहिमेत भेटलेले आमचे अजुन एक डोंगरमित्र. कुटूंबाला घेऊन निघाले होते घनगडाच्या भेटीला ! त्यांच्याशी दोन शब्द बोलुन,परत वाटेला लागलो. बाकी या रस्त्याने चालायला पण मजा वाटत होती. लोकांना राजमाची पॉइंटवरुन दिसणाऱ्या धबधब्याचं कौतुक,आम्हाला मात्र आडवाटेवरच्या छोट्या - मोठ्या खाचरांचं आणि तुडुंब वाहणार्या ओढ्याचं अप्रूप !



तशी लोणावळा- खंडाळा, ही पावसात अफलातून गर्दी खेचणारी घाटमाथ्यावरील प्रसिद्ध ठिकाणं. त्यात भुशीडॅमचं तर लोकांना फारच कौतुक! पण त्याच रस्त्यावर भांबरडे फाट्यावरुन दहा- बारा  किमी आत शिरलो की माणसांची वर्दळ कमालीची कमी होते आणि इथे असतात फक्त दोघे,एक निसर्ग अन् दूसरे तुम्ही. सालतर ची खिंड ओलांडून तैलबैल फाट्याला लागलो की अर्ध्या तासात आपण गावात प्रवेश करतो. तैलबैलला जायला लोणावळ्यावरुन बससेवा आहे,पण तेवढ्या वेळा सांभाळल्या तर सोयिस्कर. जेमतेम शंभर सव्वाशे लोकसंख्या असलेलं, ऐन घाटमाथ्यावरचं हे सुंदर गाव नजरेस भरतं ते इथल्या नैसर्गिक जुळ्या भिंतीमुळे. इथे येणारा प्रत्येकजण भारावूनच जातो.  हे प्रस्तर म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकाचं जणु दिवास्वप्नच!  अनेक कातळारोहणपटुनी आरोहण केलेली ही भिंत म्हणजे सह्याद्रीच्या रांगेतलं निसर्गाविष्कार! दोन भिंतीच्या मध्ये गावाचा देव भैरोबा वसलाय,त्याच्याच बाजूला गार पाण्याचे टाके आणि मिळून छप्पर,मंदिर आता चांगलं बांधलंय. गावातली लोकं सांगतात, देव आधी डाव्या बाजुच्या भिंतीवर जाताना एक टाकं लागतं तिथे वस्तीला होता,सोयीप्रमाणे आणला खाली गावात. बाकी तैलबैल हे सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु असला तरी पाऊसकाळ सोडून इथे येणाऱ्यात कातळारोहणपटुचीच जास्त वर्दळ. असाच पायगाडीचा प्रवास उरकून आम्ही गावातल्या रोकडे काकाच्या घरी पाठपिशवी उतरवली तेव्हा तैलबैलाच्या जुळ्या भिंती धुक्यातुन आत - बाहेर करत होत्या. घराच्या ओसरीत एक ग्रुप आधीच हजर होता अन् बाजुच्या बंबात त्यांच्या आंघोळीचं पाणी तापत होतं. त्यांच्यातही एकजण ओळखीचं निघालं, गप्पाटप्पा झाल्या. अंधार व्हायला अजुन बराच अवकाश होता. कॅमेरा अन् छत्रा (माझी जंबो छत्री :) ) घेऊन आमची पठारावरील सैर सुरू झाली. धुकं दाटलं असलं तरी अधून मधून विरळ होत होतं.त्यातच भिंतीच्या खालच्या झाडीवर नेमका प्रकाश पडून त्याचा एक अप्रतिम नजारा डोळ्यांसमोर आला. थोड्याच वेळात धुक्याच्या सोबतीला पावसाने जी काही जोरदार सुरुवात केली,वीस मिनिटे जागचं हलताही आलं नाही.


इथल्या जुळ्या भिंती कमालच दिसत होत्या, गेल्या प्रजासत्ताकदिनी 7 तासात तीन बाजूंनी आम्ही त्या सर केल्या होत्या, त्यानंतर मार्चमध्ये दोन दिवसांत चारही बाजूंनी सर केल्या. तेव्हाच्या आठवणींना उजाळा मिळाला. अजुन एक विशेष म्हणजे तैलबैल पठाराचा भव्य विस्तार अन् तेथुन कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा! त्यातल्या मुख्यतः उत्तरेला वाघजाई अन् दक्षिणेला सुधागड जवळ करायचा असल्यास घोडेजीन आणि या दोघींच्या मध्ये सवाष्णी या परिचित. बाकी केवणी पठारावरून नाणदांड घाट,नाळेची वाट  आहेतच. यांची नावं पण मजेशीर अन् लोभसवाणी ! पण ही फक्त नावं नाहीयेत, तर इथे घडलेल्या इतिहासाचे पुरावे आहेत. पेशवेकाळात पंत सखारामाच्या पत्नीचे निधन ज्या वाटेत झाले,तो म्हणजे सवाष्णी घाट. या घाटवाटा अर्थातच पुर्वीचे दळणवळणाचे मार्ग. या वाटेनी कोण कोण गेलं असेल? आता रस्ते आलेत,वाहनं आली त्यामुळे ह्या वाटेने गावातली जुनी- जाणती सोडली तर सहसा कुणी फिरकत नाही.  यातलीच वाघजाई उतरायची,आम्ही ठरवलं होतं.




दुसऱ्या दिवशी गावातील मेणेदादांना घेऊन आम्ही वाघजाई घाटाकडे रवाना झालो. गावापर्यंत आलेला डांबरी रस्ता सोडुन बैलगाडी रस्त्याला लागलो की भिंतीचा अजुन एक अफलातून नजरा आपल्याला साद घालतो. महामूर पावसामुळं भातखाचरं अन् ओढ़े भरभरून वाहत असतात.  हिरवाकंच नक्षीदार गालिचा पांघरलेलं हे पठार मन  सूखावुन जातं.  साधारण वीस मिनिटात आपण सह्यधारेवर येऊन पोहोचतो अन् अफाट कोंकण डोळ्यांसमोर उलगडत जातं. उत्तरेपासुन सुरुवात केली तर कोंडगांव अन् धरणाची भिंत,ठाणाळे आणि त्याच्या बाजुला पार पलीकडे नाडसूर! पार पल्याड सरसगड धुक्यात, पण सुधागडाच्या पश्चिम टोकाने स्पष्ट दर्शन दिलेलं असतं. थोडंसं खाली उतरलो की डाव्या हाताला वाघजाईचे ठाणे आणि मागेच कोसळणारा जलप्रपात शांततेचा भंग करतो. उजव्या हाताला चालू लागायचे. वाटेतच मेण्याचा देव भेटतो. या देवाची पण एक मजेदार गोष्ट आहे. खालच्या ठाकरवाडीतल्या लोकांचा,माडी वजवणे(तयार करणे)हा एकमेव व्यवसाय. एके दिवशी ठाकरांकडुन वरच्या दोन मेणे पाटलांना  मेजवानीचे आमंत्रण गेले, मग काय आहे फुकट म्हटल्यावर इतकी झाली की परत वर येताना लागलेल्या वणव्यात सापडले तरीही भान नाही. होरपळुन जीव गेला,नंतर गावात त्रास वाढायला लागल्यावर येथे ते देव वसवल्या गेले. काय अजब दंतकथा असतात नाही ? कुठे झाडोरा,कुठे पठार असं करीत उतरलो की एका वळणावर येऊन थबकतो. येथून डावीकडे ठाणाळे लेण,उजवीकडे कोंडगाव अन् सरळ आपलं ठाणाळे गाव.




ठाणाळे लेणी बघण्याची इच्छा होतीच,तसंच दादांना पटवून आम्ही तिकडे ट्रेकस्थ झालोही , पण वाट जेवढी साधी सुरवातीपासून वाटत होती,तोच ती थोडं आत गेल्यावर नाहीसी झाली. शोध शोध शोधली,उजव्या बाजूला वर कातळांत लेणी स्पष्ट दिसत होती,पण शेवटी वाट नाहीच सापडली. मेणेदादांना सुद्धा सुचत नव्हतं. सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेली ही लेणी म्हणजे अप्रतिम,तेवढंच तिचे स्थान दुर्गम. घडवणाऱ्याचं खरंच कौतुक करावंसं वाटतं! आज योग नाही,अशी स्वतः ची समजूत काढून आम्ही परत घाटवाटेला लागलो. पावसात वाट जाम घसरडी झालेली,पाय चुकीचा पडला की पार्श्वभाग जमिनीला टेकलाच समजा! आस्ते कदम करत निघाव. पुढे वाटेत आपल्याला खडकात खोदलेली एकमेकांशी जोडलेली दोन टाकी आढळतात. बहुतेक वाटसरुंना पिण्याच्या पाण्याची सोय असावी. अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर एका ओहोळा जवळ थांबलो तेव्हा पाठमोऱ्या सह्यरांगेने दर्शन दिलं आणि सुखावून गेलो, मेणेदादाचा निरोप घेतला आणि गावात पोहोचलो तेव्हा पोटात कावळ्यांनी रणकंदन केलं होतं. पोटातली आग शमवून आम्ही नाडसुरची  वाट धरली.पुणेकरांसाठी वाघजाई सोयीस्कर, तो उतरून कोंडगाव,पेडली पाली-खोपोली रस्ता जवळ करता येतो. 




No comments:

Post a Comment

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences