हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - एक आव्हान

सह्यपर्वताच्या अधिपत्यात असणाऱ्या आणि ट्रेकर्सचा स्वर्ग समजला जाणारया  हरिश्चंद्रगडावर बरेचदा जाणं झालं ते खिरेश्वर मार्गे.नेहमीच भुरळ पाडणाऱ्या  कोंकण कड्याच्या बाजूला रात्री राहण्याची आणि खालून कोंकण कडा पाहण्याची इच्छा अजूनही इछाच होती. आणि कोंकणातल्या बेलपाडा गावातून नळीची वाट साद घालत होती.नळीच्या वाटेबद्दल खूप काही ऐकून होतो. बराच कठीण आहे,भरपूर रॉक पचेस आहेत,बहुतेक ठिकाणी खडी चढण आहे,चढायला रोप ची गरज लागते,वगैरे वगैरे.आधी एकदा प्लान केला होता जाण्याचा,पण काही कारणास्तव तो फसला आणि जमलेच नाही. यावेळी मात्र नळीच्या वाटेचं आव्हान काहीही झाल्या पेलायचं आम्ही ठरवलं होतं. येणारया शुक्रवारला रात्री निघायचं ठरलं.

गुरुवारी रात्री प्रसन्नाचा चा मेसेज आला "प्रसादचं आणि माझं नाही जमणार यायला",झालं.गळणाऱ्याच्या संख्येत आणखी दोघांची भर. आधीच ऋषी आणि वासू चं रद्द झालेलं. अतुल आणि सागरचं चाललेलं यायचं पण ऑफिस च्या वेळेमुळे त्याचं पण रद्द झालेलं. आता राहिलो होतो चौघं केसागर,इंद्रा,निखिल आणि मी. कमीत कमी चार जण तरी जाऊ शकतो ना ? या गोड विचारांनी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी केसागर ला काल केला तर पठ्ठ्या कॉलेजची शेवटची ग्यादरिंग असल्यामुळे जावं लागणार म्हणून काहीतरी बडबडत होता. ऐनवेळी हा माणूस टांग देण्याचा प्रयत्न करत होता . मी ओळखलं "अजून एक पान गळणार " .आणि फोन संपेपर्यंत गळालं सुद्धा. राहिलो तिघेच. 


प्रसादला फोन केला, त्यानी "हडसर-जीवधन-नाणेघाट-चावंड" हा ट्रेक सुचवला. जायला हरकत नव्हती,पण नळीच्या वाटेचा विचार आणि खूप दिवसांपासून रखडलेला ट्रेक पूर्ण करायचं स्वप्न यामुळे दुसरं काही सुचत नव्हतं. ठरवलं. आता आपण तिघेच हा ट्रेक करायचा.निखिलला पातेलं,टेंट वगैरे घेऊन संध्याकाळी साडेसहापर्यंत स्वारगेटला यायला सांगितलं. इंद्र पण तिथेच पोहोचणार होता. 

ठरल्याप्रमाणे मी ऑफिस मधुन लवकर निघालो. घरी येताना वाटेतच मामाजींचा फोन आला,"तुझं विद्यापीठातून पत्र आलंय,उद्या पदवीप्रदान समारंभ आहे." झालं,अजून एक संकट. लगेच इंद्राला सांगणार तेवढ्यात  विचार केला आधी पाहावं तर पत्र काय आहे ते ? घरी पोहोचलो,पत्रं पाहिलं. समारंभाला न जाता पदवी पोस्टाने घरी येण्याची खात्री पटली. ते सगळं बाजूला सारून sack भरायला सुरुवात केली. मामाजीचं चाललं होतं " अरे जाऊन ये,ट्रेक करायला काय सगळं आयुष्य पडलंय. पदवी हातात घेऊन फोटो काढण्याची संधी गमावशील." पण या फोटो पेक्षा मला नळीच्या वाटेच्या फोटोची भुरळ पडली होती. जाऊ दे. ट्रेकला जायचा निर्धार अजुन पक्का झाला.

व्हायचा तो उशीर झाला आणि सगळ्यांना स्वारगेटला जमायला सात-साढे सात झाले. चौकशी केल्यावर कळाले बस साढेंआठला आहे. वाट बघत बसलो. बस आली साढे नऊला. बस मध्ये बसल्यावर कळलं,बस "खोपोली मार्गे जाणार आहे" बोंबा. आम्हाला जायचं होतं माळशेज घाटमार्गे. डेक्कनला उतरून शिवाजीनगरला गेलो आणि नाशिकच्या बस मध्ये बसुन आळे फाट्याला उतरलो. रात्रीचे बारा-सव्वा बारा झाले असतील. सगळीकडे सामसूम. सरत्या हिवाळ्याची थंडी जाणवत होती.आम्ही कल्याण रोडला येऊन थांबलो. बॉटल काढायला हात पाठीमागे टाकला तर बस मधला येतानाचा प्रसंग आठवला.
बस मध्ये एकाने माझ्याकडे पाण्याची बाटली बघून प्यायला पाणी मागितले. सहप्रवासीधर्म म्हणून मी त्याला बाटली दिली. स्वतः तर पाणी कधी न पिल्यासारखा चांगली अर्ध्यापेक्षा जास्त खाली केली. आणि वरून कहर म्हणजे त्याच्या मित्रांना प्याऊ सुरु केल्यासारखं पाणी पाजून बुडाला लागलेली बाटली परत केली. म्हटलं "धन्यवाद ,आभारी आहे ". आता याला काय म्हणावं ? म्हणजे "एखाद्याला खायला ऊस द्यावा आणि त्याने तो मुळासकट उपटून खावा " अशीच अवस्था झाली होती.
अर्थात दोघांकडच पाणी  आधीच संपलं असल्यामुळे आम्हाला पाणी शोधणं गरजेचं होतं. आजुबाजुला कुठे चहाची टपरी पण नव्हती. तेवढ्यात दोघे वयस्कर माणसे बस चीच वाट पाहत असताना दिसले. त्यांना बस बद्दल विचारलं. तर बीड-कल्याण बसची वेळ झालेली आहे येईल इतक्यात असं समजलं. बस येईपर्यंत पाणी भरायला आळेफाट्याच्या स्थानकावर गेलो तोच त्या माणसांनी बस आलीये म्हणून ओरडायला सुरुवात केली. अर्धवट पाणी भरून बस मध्ये बसलो.

आम्हाला उतरायचं होतं सावर्णे या गावी. एक तर या गावाचं ठिकाण,स्वारगेट बस स्थानकावर कंडक्टर पासून डेपो मनेजर पर्यंत कुणालाच धड सांगता येत नव्हतं. त्यामुळे गावात व्यवस्थित बस स्थानक असेल याची दाट शक्यता नव्हती. आणि वरून या कंडक्टर ला पण माहित असेल की नाही याची भीती होती. कंडक्टरला सावर्णेचं  तिकीट मागितलं. "कुठे आलं ते ?",कंडक्टर उत्तरला. बोंबल,ह्याला पण माहित नव्हतं. ज्या गोष्टीची भीती होती, तेच झालंय."माळशेज घाट संपायच्या थोडसं अलीकडे. ",मी बोललो. इंद्रा आणि निखिल मागे बसले होते. "गाडी थांबत नाही",कंडक्टरची प्रतिक्रिया.मी विनवणी करत होतो. कंडक्टर मोठ्याने ओरडला,"रात्री घाटात गाडी थांबणार नाही". माणूस ऐकालाच तयार नव्हता. ओतूरला उतरलो. रात्रीचे दीड-दोन वाजले असावेत. आता सूर्योदयाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दिली ताणून बस स्थानकावर.

सकाळी चार-साढे चारला उठलो. गडबडीत आवरलं आणि सकाळची पहिली बस पकडायची म्हणून कल्याण रोडला येउन थांबलो. आजूबाजूला काळं कुत्रं सुद्धा नव्हतं दिसत. रात्रभर भुंकणारं पण नेमकं यावेळेस साखरझोपेत असावं कदाचित कारण त्याचाही आवाज बंद झालेला . आणि आम्ही भटके बस ची वाट पाहत भूतासारखे रस्त्यात उभे होतो. पाच वाजले ,सहा झाले तरी बस चा पत्ता नाही,आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबायलाच तयार नव्हत्या. वैतागुन एका उघडलेल्या टपरीवर चहा घेतला आणि परत काही मिळतं का याची वाट पाहत रस्त्यावर येउन थांबलो. आणि शेवटी एकदाची एका माणसाने त्याची क्रुझर थांबवली आणि माळशेज घाटातुन आमचा प्रवास सुरु झाला. इंद्रा आणि निखिलनी तर बसल्या बसल्या ताणुन दिली. मी जागा होतो. ड्राईवर म्हटला तर खरा,पण त्याला पण सावर्णे गावाची माहिती असेल की नाही यात शंका होती.

सहयपर्वताची मुख्य रांग कापत गाडीने घाट उतरायला सुरुवात केली आणि दक्षिणेस  डाव्या बाजूला भैरवगडाच्या कातळ भिंतीने आणि नानाच्या अंगठ्याने लक्ष वेधून घेतले. उजव्या बाजूला(उत्तरेकडे) नाफत्याचे उंचच उंच कडे,हरिश्चंद्रगडाचा भाग असलेल्या रोहिदासाचे शिखर यांचं दर्शन झालं. दोहोंच्या मधल्या कोंकण कड्याने जणू काही तुमचीच वाट बघतोय अशा अविर्भावात दुरून हातवारे केल्यासारखं जाणवलं. हे बघण्याच्या नादात आम्ही पार मोरोशी जवळ येऊन पोहोचलो.प्रसादनी सांगितल्यानुसार मध्ये एक पोलिस चौकी लागते,त्याच्या अलीकडे थांबायचं होतं. बोलण्याच्या नादात ड्रायव्हरला पण नाही कळलं.
जवळपास १० किमी पुढे आलो होतो. तेथून वालीवरेला जायला रस्ता दिसत होता,पण ते अंतर बरंच असल्यामुळे तसंच परत एका ट्रकमध्ये बसुन सावर्णे चा प्रवास सुरु झाला. सकाळचा मंद वारा ती सकाळ अतिप्रसन्न करण्यास समर्थ होता. भैरव गडाच्या कातळकड्याचे परत दर्शन होताच,गडाला भेट देण्याची इच्छा अजून तीव्र होत चालली होती. माळशेज घाटचा दृष्ट लागण्यासारखा रस्ता न्याहाळत आम्ही ट्रक मधल्या प्रवासाचा आनंद घेत होतो.  रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांचा पालापाचोळा वाऱ्या मुळे इकडे-तिकडे उडत होता. हा प्रकार बघत बघत आम्ही सावर्णे गावाजवळ येउन पोहोचलो.

सकाळचे साधारण सात सव्वा-सात झाले असतील. पैसे देताना ट्रक ड्रायव्हर विचारता झाला, "इकडे कुठं भटकले?" आम्ही त्याला बोट दाखवुन म्हटलं,"तो जो डोंगर दिसतोय ना!, हा तो! चढून जाणार आहे आम्ही."कमाल हाये बा तुमची!",डोक्याला हात लावुन ड्रायव्हर पुटपुटला. त्याच्याकडे हसरा कटाक्ष टाकत आम्ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन बसलो. चहा घेऊन हुशार झालो आणि बेलपाड्याकडे चालत निघालो.

दहा बारा घरांची वस्ती असलेलं सावर्णे गाव. सकाळची वेळ असल्यामुळे बायाबापडयांची कामे चाललेली. त्यातली काही जण आमच्याकडे आश्चर्याने पाहत होती. रस्ता विचारून पुढे निघालो.मला नेहमी विचार पडतो,"या गावकर्यांना आम्हा भटक्याबद्दल काय वाटत असेल?" म्हणजे,"उगाच हे डोंगर चढून या लोकांना काय मिळत असेल",असाच विचार करत असतील,नाही? एका आजोबाला वाट विचारून आम्ही बेलपाड्याच्या खिंडीकडे चालायला सुरुवात केली. वाटेत लागणारा ओढा पार करून अर्ध्या तासाच्या चढाई नंतर आम्ही खिंडीजवळ येउन पोहोचलो. खिंडीतून नाफ्त्याचा कडा अजूनच भीषण वाटत होता. थोडा वेळ शांत बसुन आसमंत न्याहाळला.खिंड उतरायला सुरुवात केली.खाली उतरून शेत-शिवाराच्या दांडाला लागलो. वसंताची चाहूल लागल्यामुळे आंब्याच्या,जांभळा-करवंदाच्या झाडांना मोहोर यायला सुरुवात झाली होती. असंच एका आंब्याच्या बागेतून जाताना मोहरलेल्या झाडांनी मन मोहरून टाकले.



एका तासात आम्ही बेलपाड्याला पोहोचलो.आणि वालीवारे म्हणजेच बेलपाडा होय, हे तेव्हा कळलं. मध्ये एक नदी,ओढा लागला. नदीवरचा सांकव ओलांडुन पलीकडे गेलो तर,विहिरीवर पाणी भरणाऱ्या बायाबापड्या आमच्याकडे बघत लाजऱ्याबुजऱ्या झाल्या. "आता हे ध्यान कुठून आलं म्हणावं?" असाच विचार कदाचित ते आमच्याबद्दल करत असतील. त्यांच्याकडून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि गावातल्या मुख्य रस्त्यावरून चालत,दोन तीन शेत-शिवार पार करून नाळेच्या तोंडाशी म्हणजे मघाच्या नदीच्या उगमा जवळ येउन पोहोचलो. नदीचं नाव काळू नदी. नळीच्या वाटेच्या पाण्यानी पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारी.आता थोडेफार पाणी होते.नदी बाजूला ठेवून आम्ही नळीच्या वाटेकडे चालायला लागलो.

अरे बापरे ! समोर नाफ्ता,कोंकण कडा आणि रोहिदास शिखर. आम्हा भटक्यांची वाचा बंद. म्हणजे याला काय म्हणावं सुचत नव्हतं. निसर्गाने जणु सह्यापर्वताचा आकाशाला भिडणारा उंचच उंच बांधुन तयार ठेवलेला मंच. जवळपास समुद्रसपाटीच्या उंचीवरून अजूनच अक्राळ विक्राळ वाटत होता.सकाळच्या पहिल्या सुर्यकिरणांना देखील आपल्यापर्यंत पोहोचायला एवढा वेळ लागावा,इतका तो उंच आणि पसरलेला उभा कातळकडा.वाह ! रात्रीच्या जागरणाच चीज इथेच झालं असं वाटायला लागलं.


दाट जंगलातुन वाटा काढत आम्ही नाळ गाठायला सुरवात केली. मध्ये एक झोपडी दिसली.आजूबाजूला शेत केल्यासारखी जागा होती. जाऊन पाहिलं तर एका आजोबांची भेट झाली. मनात विचार आला, पुढच्या वेळेस आलो तर झोपडीच्या बाजूला राहण्याचा मस्त बेत होईल. आजोबांना रस्ता विचारला तर त्यांनी हातातला विळा रोखून वाट दाखवली. "अहो आजोबा,इथे सात-आठ जणांची राहण्याची सोय होईल का ?",मी विचारलं. "पन्नास येऊ दे." ऑ! आजोबांच्या उत्तराने सुखावलो आणि परत आमची भटकंती चालू झाली.  थोड्याच वेळात दगड धोंडे सुरु झाले म्हणजेच नाळ सुरु झाली.

उजव्या बाजूला भीषण कोंकण कडा. त्यामागून सुर्यनारायण उगवत तापायला सुरुवात झाली होती. कोंकण कडा आणि रोहिदास यांच्या मधल्या खाचेतून सूर्यकिरणे डोकावत होती. जणू काही सह्यकड्याचा आणि सूर्यकिरणाचा लपंडाव चाललेला आहे असं भासत होतं. निसर्गाच्या या निरागस खेळाचा आनंद घेत आम्ही नाळेतून चालत होतो. मोठ-मोठे दगड चढताना बोराटाच्या नाळेची आठवण येणार नाही असे कसे होणार. पण यावेळेस आम्ही नाळ चढत होतो. 

अर्ध्या-पाऊण तासाच्या चढाई नंतर आम्ही नाळेच्या मुख्य तोंडाशी म्हणजे खरंतर जेथून घसरड्या दगडांचा रस्ता चालू होतो तिथे येउन पोहोचलो. अंतर जास्त वाटत नव्हतं,मनात विचार आला एक दोन तासात चढून होईल,लोकांनी इतका का बाऊ करून ठेवलाय या वाटेचा ? कळत नाही. पण लगेच थोडं पुढे चढत गेलो आणि भ्रमनिरास झाला, कळाले आम्हाला,इथे येणारे बरोबर बोलतात!

खरी कसोटी येथुन लागणार होती. इंटरनेट वर तसं बरंच पारायण करून आलो होतो. त्यामुळे नाळेत वर चढेपर्यंत किती रॉक पचेस आहेत यांची इत्यंभूत सगळी माहिती होती. सह्याद्रीच ते भीषण,रौद्र निसर्ग सौंदर्य अनुभवत आम्ही पहिल्या खडकाच्या कठीण तुकड्या(रॉक प्याच) पर्यंत पोहोचलो.तो भाग सहज पार करत पुढे निघालो. पहिला भाग पार केला खरा पण जवळचे सगळे पाणी संपले होते.पुढे चालत राहिलो. ऊन वाढत होतं,तोंड सुकली होती,घशाला कोरड पडायला सुरुवात झाली होती. तेवढ्यात पुढच्या रॉक प्याचला दोघे-तिघे जण बसले होते. त्यांनी प्यायला पाणी दिले,जीव भांड्यात पडला. तिथे भास्कर ची ओळख झाली. भास्कर - म्हणजे कोंकण कड्याचा मालक :) हा हा! निदान आम्हाला तरी तो कोंकण कड्याचा मालकच वाटतो निखिल पुढे दुसरा प्याच चढून आमची वाट बघत बसला होता. भास्करच्या माहितीनुसार आता कोंकण कडा येईपर्यंत पाण्याचा दुष्काळ.थोडा वेळ शांत बसलो, नाळेच निरीक्षण करत. अप्रतिम म्हणजे चाबुक,महादेवाने तांडव करावा तसं निसर्गाने अक्षरशः तांडव मांडला होता. पण तांडव मात्र शांत वाटत होता.सह्याद्रीचे ते उंचच उंच कडे जणू काही चाकूने तुकडे केलेल्या केकचे चिरे भासत होते. आणि ते उंच कातळ-कडे आता आकाशाला भिडतात कि काय असं वाटायला लागतं.निसर्गाच्या सादेला हाक देत आम्ही दुसरा खडतर भाग चढून पुढे निघालो. 




आणि आता तर निसर्गाने  काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं आमच्या ताटात. तिसरा रॉक प्याच यायच्या आधीच ही खडतर वाट! या वाटेवरून चालायचे/चढायचे म्हणजे अधे मध्ये थांबणे नाही. थांबला तो संपला. थांबला तर ज्या दगडांना तुम्ही धरलंय तो दगड एकतर हातात येईल,नाहीतर ज्या दगडावर थांबलाय तो तरी घसरून खाली पडेल. याचा अर्थ तुमचा तोल जाऊन तुम्ही खोल दरीमध्ये पडू शकता. ही वाट पार करून तिसऱ्या रॉक प्याच च्या तोंडाशी येऊन पोहोचलो. याला मुळीचा प्याच असेही म्हणतात. हा प्याच थोडा ट्रिकी असुन चढायला रोपची मदत लागती. आधीच एका टीमने रोप बांधला असल्यामुळे,आम्ही आमच्या रोप चे उत्घाटन न करता त्याच रोपने वर चढलो. त्यानंतर मोठ्या खडकाला वळसा घालून एक धोकादायक ट्रवर्स पार केला. ट्रवर्स पार करताना खोल दरीची भीषणता जाणवत होती. पण आता थोडीफार सवय झाल्यामुळे लगेच पार करून खिंडीत येऊन पोहोचलो. नळीची वाट संपली. हायसे वाटले. 


धन्यवाद - आभारी आहे 
याचा पुढचा भाग हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - कोंकण कडा 

8 comments:

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences